जत तालुक्यातील घोलेश्वर येथे वीज कोसळून घराला आग;२.५० लाखांचे नुकसान
जत तालुक्यातील घोलेश्वर येथे वीज कोसळून घराला आग;२.५० लाखांचे नुकसान
जत (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील घोलेश्वर येथे बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान एक भीषण दुर्घटना घडली.गावातील रहिवासी श्री.अर्जुन ज्ञानेश्वर आटपाडकर यांच्या घरावर वीज कोसळल्याने घराला भीषण आग लागली.
या आगीत घराचे आणि घरातील साहित्याचे सुमारे २.५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,काल (बुधवारी) सायंकाळच्या सुमारास जत तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली होती.याच दरम्यान घोलेश्वर येथील आटपाडकर यांच्या घरावर अचानक वीज पडली.विजेच्या धक्क्याने घराला तातडीने आग लागली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की,पाहता पाहता घरातील महत्त्वाचे कागदपत्रे,धान्य, कपडे आणि घरगुती वापराचे साहित्य जळून खाक झाले.सुदैवाने,या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते,मात्र ऐन गुडी पाडवा सणाच्या तोंडावर आटपाडकर कुटुंबाचे राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली,मात्र तोपर्यंत नुकसान झाले होते.
या गरीब कुटुंबाचे झालेले नुकसान पाहता,महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून आटपाडकर कुटुंबाला सरकारी मदत जाहीर करावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
७८७५९०३७७७.