Maharashtra

ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन २० मार्चला: शतकमहोत्सवी वर्षाच्या दिशेने

ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन २० मार्चला: शतकमहोत्सवी वर्षाच्या दिशेने वाटचाल..

महाड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी महाड येथे झालेला ऐतिहासिक सत्याग्रह हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा क्रांतिकारी टप्पा मानला जातो. महाड येथील चवदार तळे येथील पाणी सर्वांसाठी समान हक्काने उपलब्ध व्हावे, या मूलभूत अधिकारासाठी उभारण्यात आलेल्या या सत्याग्रहाने देशातील सामाजिक समतेच्या चळवळीला नवी दिशा दिली.

या ऐतिहासिक घटनेचा ९९ वा वर्धापन दिन यंदा २० मार्च २०२६ रोजी महाड येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षी या क्रांतिदिनाचे शतकमहोत्सवी वर्ष सुरू होत असल्याने यंदाचा वर्धापन दिन अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे यंदा राज्याच्या किंबहुना देशभरातील विविध राज्यांतून लाखो भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते महाडमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंगची सोय, पाणीपुरवठा, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेबाबत व्यापक नियोजन करण्यात येत आहे.

कार्यक्रमा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, महाड नगरपालिकेकडून चवदार तळे परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण तसेच भाविक आणि अभ्यागतांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील प्रमुख रस्ते, सभास्थळे आणि महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चवदार तळे येथे अभिवादन कार्यक्रम, जाहीर सभा, भीमगीतांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक समतेचा आणि मानवमुक्तीचा संदेश देणारा हा ऐतिहासिक क्रांतिदिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button