पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला प्रारंभ.
पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला प्रारंभ
पिंपरी : महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील १५ हजार ३०० पदांसाठी सुरू असलेल्या मेगा भरतीअंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात ४६२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीच्या मैदानी चाचणीला बुधवार (११ फेब्रुवारी) पासून भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडांगण येथे सुरुवात झाली.
दररोज सुमारे ५०० ते ८०० उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात येत असून मैदानावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक व गैरप्रकारमुक्त राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, आरएफआयडी तंत्रज्ञान, बायोमेट्रिक प्रणाली यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच लेखी परीक्षेदरम्यानही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
उमेदवारांना एकूण ५० गुणांची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक, तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक अशा चाचण्या घेतल्या जात आहेत.
मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना उपलब्ध पदांच्या प्रमाणात एकास दहा या गुणानुक्रमानुसार लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. मोठ्या संख्येने युवक-युवतींनी सहभाग घेतल्याने भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.


