भाईंदर पूर्वेत माकडांचा त्रास; घरात घुसून महिलेवर हल्ला*
*भाईंदर पूर्वेत माकडांचा त्रास; घरात घुसून महिलेवर हल्ला*
मिरा रोड | प्रतिनिधी
भाईंदर पूर्वेकडील न्यू गोल्डन नेस्ट परिसरातील इंद्रप्रस्थ सोसायटीत मागील दोन–तीन महिन्यांपासून दोन माकडे फिरत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मंगळवारी यातील एक माकड थेट एका घरात घुसले आणि घरातील महिलेवर हल्ला केला. मात्र महिलेने धैर्य दाखवत स्वतःचा बचाव केला आणि माकडाला घराबाहेर हुसकावून लावले.
मिरा–भाईंदर हे शहर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असल्याने अन्नाच्या शोधात माकडे शहरात येतात. अन्न सहज मिळत असल्यामुळे काही माकडे इमारतींमध्येच थांबतात. इंद्रप्रस्थ सोसायटीतही माकडांचा त्रास वाढला होता. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांना घराबाहेर पडणे धोकादायक झाले होते.
माकडे घरातील वस्तू फोडणे, कपडे पळवणे आणि अन्न चोरणे असे प्रकार करत होती. आता थेट माणसांवर हल्ला होऊ लागल्याने नागरिक चिंतेत होते.
या त्रासाबाबत नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार केली होती. पिंजरा नसल्याने कारवाई उशिरा झाली. मात्र हल्ल्याची घटना घडल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन दोन्ही माकडे पकडली. त्यानंतर त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब