रामेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी; माहिती न मिळाल्यास संघर्षाचा इशारा – बोरशे गुरुजी

रामेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी; माहिती न मिळाल्यास संघर्षाचा इशारा – बोरशे गुरुजी
जालना (भोकरदन) : रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कारभारातील कथित आर्थिक अनियमितता व कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करजगाव येथील संस्थापक सदस्य के. व्ही. बोरशे (बोरशे गुरुजी) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कारखाना प्रशासनाला आवश्यक माहिती देण्याबाबत लेखी पत्र दिले असून, समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.
बोरशे गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सहकारी सोसायटीकडून कर्ज घेऊन कारखान्याचे शेअर्स घेतले व संस्थापक सदस्य झाले. सुरुवातीच्या काळात कारखान्याचा कारभार सुरळीत चालत होता तसेच सर्वसाधारण सभांच्या सूचना व निवडणूक कार्यक्रमाची माहिती नियमित मिळत होती. मात्र, नंतर काही सदस्यांना मतदार यादीतून वगळण्यात आले तसेच पत्रव्यवहार बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कारखान्याच्या कामकाजाबाबत सर्वसाधारण सभा व निवडणूक प्रक्रियेत हेतुपुरस्सर काही सदस्यांना सहभागी होण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे कारखाना नफ्यात आहे की तोट्यात याची माहिती सदस्यांना मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कारखाना तोट्यात दाखवून शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचा हिशोब देण्यात येत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
कारखान्याच्या जमिनी व मालमत्तेवर काहींचा डोळा असल्याचा आरोप करत अनेक संस्थापक सदस्यांमध्ये नाराजी असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच सर्व सदस्यांची सामूहिक सभा घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याचा कारभार खासगी मालमत्तेसारखा चालवला जात असून आर्थिक अनियमिततेची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत, अन्यथा संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रतिनिधी महेंद्र बेराड

