Maharashtra

*मीरा-भाईंदरला अमराठी महापौर, डिंपल मेहता यांची निवड*

*मीरा-भाईंदरला अमराठी महापौर, डिंपल मेहता यांची निवड*

मिरा रोड | प्रतिनिधी
मिरा-भाईंदर महानगरपालिकेत महापौर निवडीवरून वातावरण तापले होते. शहरात मराठी महापौरच हवा अशी मागणी मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली होती. मात्र या विरोधाकडे दुर्लक्ष करत भाजपच्या उमेदवार डिंपल मेहता यांची महापौर म्हणून निवड निश्चित झाली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली. मीरा-भाईंदरमध्ये मात्र या निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला.
महापौर पदासाठी अर्ज मागे घेण्याच्या वेळेत कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर मतदान झाले. भाजपच्या सर्व 78 नगरसेवकांनी आणि 1 अपक्ष नगरसेवकाने डिंपल मेहता यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे त्यांना एकूण 79 मते मिळाली आणि त्या महापौर झाल्या.
उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील
उपमहापौर पदासाठी भाजपकडून ध्रुवकिशोर पाटील यांना देखील 79 मते मिळाली. त्यामुळे ते उपमहापौरपदी निवडून आले आहेत.
*मतदानाचा निकाल*
महापौर पदासाठी काँग्रेसच्या उमेदवार रुबीना शेख यांना मीरा-भाईंदर विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी मतदान केले. मात्र डिंपल मेहता यांना जास्त मते मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला.

*राजकीय आरोप-प्रत्यारोप*
आमदार प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या वेळी या समितीने उबाठा आणि मनसेला पाठिंबा दिला. त्यावेळी भाजपला साथ दिली असती, तर आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती.
मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर निवडीमुळे मराठी समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, पुढील काळात या मुद्द्यावर राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी बाळकृष्ण परब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button