मिरा-भाईंदरपर्यंत मेट्रो धावणार; सीएमआरएसची मंजुरी, फडणवीस दावोसहून परतल्यानंतर उद्घाटनाची तारीख ठरणार* मिरा रोड | प्रतिनिधी
*मिरा-भाईंदरपर्यंत मेट्रो धावणार; सीएमआरएसची मंजुरी, फडणवीस दावोसहून परतल्यानंतर उद्घाटनाची तारीख ठरणार*
मिरा रोड | प्रतिनिधी
मुंबई व लगतच्या महानगर क्षेत्रातील महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईसह मीरा-भाईंदरकरांना याच महिन्यात मेट्रोची मोठी भेट मिळू शकते. मुंबई मेट्रो लाईन 9 (रेड लाईन) च्या पहिल्या टप्प्यासाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांची अधिकृत मंजुरी मिळाली असून, 20 जानेवारी रोजी ही स्वीकृती देण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर तसेच मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये महापौर निवड प्रक्रिया पूर्ण होताच मेट्रो 9 चा पहिला टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा प्रवास लवकरच अधिक सुकर होणार आहे.
*पहिल्या टप्प्यात सुमारे ५ किमीचा मार्ग सुरू**
सीएमआरएसच्या मंजुरीला विलंब झाल्याने उद्घाटन रखडले होते. आता मात्र सर्व अडथळे दूर झाले आहेत. मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्यात दहिसर ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या १३.५८ किमी लांबीच्या कॉरिडोरपैकी दहिसर (पूर्व) ते मीरा रोड येथील काशीगावदरम्यान अंदाजे ५ किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या मार्गावर यशस्वी ट्रायल रन आधीच पार पडली आहे.
याचबरोबर मुंबई मेट्रो लाईन 2B देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत मेट्रो सेवा सुरू होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव ही स्थानके कार्यान्वित होतील. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
*रेड लाईन म्हणून ओळखली जाणारी मेट्रो 9*
मुंबई मेट्रोची लाईन 9 (रेड लाईन) दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. उत्तर मुंबईतील दळणवळण अधिक सक्षम करणे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कमी करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. संपूर्ण लाईन 9 मध्ये एकूण 10 स्थानके असणार आहेत. त्यामध्ये दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव (अमर पॅलेस), काशीगाव, साईबाबा नगर, मेडतिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन (मॅक्सस मॉल), सुभाषचंद्र बोस स्टेडियम, एमबीएमसी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि इंद्रलोक ही स्थानके समाविष्ट आहेत.
ही लाईन मेट्रो 2ए आणि मेट्रो 7 शी इंटरकनेक्टिव्हिटी प्रदान करणार असल्याने अंधेरी, बांद्रा तसेच दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या भागांपर्यंत प्रवाशांना सहज पोहोचता येणार आहे. संपूर्ण मेट्रो 9 लाईनचे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिनिधी बाळकृष्ण परब
