नोकरी करताना रिक्षा परवाना बाळगणाऱ्यांना RTOचा इशारा परवाना तात्काळ जमा करा, अन्यथा कडक कारवाई.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी पुणे : सरकारी, निमसरकारी किंवा खासगी नोकरी करत असतानाही ऑटोरिक्षा परवाना बाळगणाऱ्यांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कारवाईचा इशारा दिला आहे. अशा परवानाधारकांनी स्वेच्छेने व तात्काळ आपले रिक्षा परवाने आरटीओकडे जमा करावेत, अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन विभागाने २०१७ पासून मोठ्या प्रमाणावर रिक्षा परवाने दिले. या प्रक्रियेत बेरोजगारांना रोजगार मिळाला. मात्र, नियमांनुसार रिक्षा परवाना मिळवण्यासाठी अर्जदार कोणत्याही प्रकारच्या नोकरीत नसणे बंधनकारक आहे. परवाना देताना तसे प्रतिज्ञापत्रही घेतले जाते. तरीदेखील, नोकरी करत असतानाही रिक्षा परवाना बाळगणारे अनेकजण असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले आहे.
सध्या पुणे शहरात ८३ हजारांहून अधिक, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त रिक्षा परवाने आहेत. नियमानुसार, परवाना घेतल्यानंतर नोकरी लागल्यास संबंधिताने तो परवाना आरटीओकडे परत करणे आवश्यक आहे.
याबाबत पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले की, “रिक्षा परवाना घेताना नोकरी नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले जाते. नंतर नोकरी लागल्यास परवाना परत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या नोकरी करणाऱ्यांनी आपले रिक्षा परवाने तात्काळ जमा करावेत.”
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना रद्द करणे, दंडात्मक व कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी वेळेत कारवाई करण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे
प्रतिनिधी : शाम शिरसाठ

