युनिक कास्टल इमारतीत दुरुस्ती कामादरम्यान अपघात; प्लंबर संतोष गुप्ता यांचा दुर्दैवी मृत्यू*
*युनिक कास्टल इमारतीत दुरुस्ती कामादरम्यान अपघात; प्लंबर संतोष गुप्ता यांचा दुर्दैवी मृत्यू*
मिरा रोड | प्रतिनिधी
मिरा रोड येथील एमटीएनएल रोडवरील युनिक कास्टल इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना उंचावरून पडून एका प्लंबरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. संतोष गुप्ता (वय ४७) असे मृत कामगाराचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुप्ता हे इमारतीत उंचावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली कोसळले. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, कामाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा साधने उपलब्ध होती का, तसेच कामगार सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बांधकाम व दुरुस्ती कामांदरम्यान कामगारांच्या सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
