Maharashtra

भोसरीतील आळंदी रोड – हनुमान कॉलनी रस्त्याची दुर्दशा

भोसरीतील आळंदी रोड – हनुमान कॉलनी रस्त्याची दुर्दशा
सहा महिने उलटले तरी रस्ता पूर्ववत नाही; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त
भोसरी येथील आळंदी रोडवरील हनुमान कॉलनी परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांच्या संतापाचा विषय बनली आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर पाणीपुरवठा लाईन टाकण्यात आली. त्यानंतर ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामासाठी संपूर्ण रस्ता खोदण्यात आला. मात्र या कामाला तब्बल सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही रस्ता अद्याप पूर्ववत करण्यात आलेला नाही.
महानगरपालिकेच्या नियमांनुसार कोणतीही पाणी किंवा ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर संबंधित विभागाने रस्ता तात्काळ पूर्ववत करणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात पाणी लाईन टाकणारा विभाग आणि ड्रेनेजचे काम करणारा विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
“ही आमची जबाबदारी नाही” असे सांगत प्रशासन हात झटकण्याचे काम करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य
रस्त्याच्या दुर्दशेत भर म्हणून या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचरा संकलनाची गाडी येऊन कचरा उचलून नेते, मात्र काही वेळातच पुन्हा त्याच ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी, डासांचा त्रास आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
लोकप्रतिनिधीही उदासीन
या भागाकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत, ना प्रशासन गांभीर्याने दखल घेत आहे. सध्या निवडणुकीच्या कामात सर्वच व्यस्त असल्याने नागरिकांच्या दैनंदिन समस्या पूर्णपणे दुर्लक्षित झाल्या आहेत.
वाहनचालक, पादचारी, शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांचा सवाल – दाद कुणाकडे मागायची?
“कर भरतो आम्ही, त्रास सहन करायचा आम्हीच?” असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
प्रशासन यावर नेमकी कोणती उपाययोजना करणार? रस्ता कधी पूर्ववत होणार? कचऱ्यावर कायमस्वरूपी उपाय कधी होणार?
असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून आता नागरिकांनी दाद कुणाकडे मागावी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button