पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक : जाहीर प्रचार १३ जानेवारी रोजी सायं. ५.३० वाजता संपणार
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड : मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रचार बंदीचा कालावधी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर लागू होणार आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराचा कालावधी मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता समाप्त होणार आहे.
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट मिडीयामधून कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास बंदी राहणार आहे. यामध्ये मेसेजिंग अॅप्स व सोशल मिडीयाचा देखील समावेश असून व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर (एक्स) आदी माध्यमांवरून प्रचार करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर संबंधित उमेदवार व राजकीय पक्षांनी प्रचाराशी संबंधित सर्व साहित्य तात्काळ काढून टाकणे आवश्यक आहे. जर प्रचार साहित्य काढण्यात आले नाही, तर मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून प्रचार साहित्य काढण्यासाठी झालेला खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जाहीर प्रचार बंदीनंतर कोणत्याही पद्धतीने—इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मिडीयाद्वारे—प्रचार करू नये तसेच सर्व प्रचार साहित्य तात्काळ हटवावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे
