Maharashtra

संपादकीय: महाराष्ट्राचा बिहार झाला का? — सत्तेसाठी सुरू असलेली राजकीय अधोगती

संपादकीय: महाराष्ट्राचा बिहार झाला का? — सत्तेसाठी सुरू असलेली राजकीय अधोगती

– उमेश कुलकर्णी

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक ओळख नाही, तर विचार, संस्कृती आणि मूल्यांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी घडलेला हा महाराष्ट्र आज वेगळ्याच वळणावर उभा असल्याचे चित्र दिसते. सध्याची परिस्थिती पाहता मनात एकच अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो — महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का?

आज राजकीय परिस्थिती इतकी खालच्या पातळीवर गेली आहे की कोणी AB फॉर्म पळवतो, कोणी उमेदवारीसाठी अंगावर पेट्रोल ओतून घेतो, कोणी टीव्ही फोडून संताप व्यक्त करतो, तर कोणी उमेदवारी न मिळाल्याने चक्कर येऊन थेट रुग्णालयात दाखल होतो. हे सर्व प्रकार पाहता लोकशाहीची प्रतिष्ठा डळमळीत होताना स्पष्टपणे दिसते.

राजकारण म्हणजे सेवा, त्याग आणि समाजहिताची जबाबदारी असते. मात्र आज ते सत्तेसाठीच्या अंध स्पर्धेत बदलले आहे. कालपर्यंत ज्यांच्यावर टीका केली जात होती, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वतःची नीतीमूल्ये, विचारधारा आणि भूमिका बाजूला ठेवून केवळ सत्तेसाठी धाव घेतली जात आहे.

हे सगळं पाहून मनात एक गंभीर प्रश्न उभा राहतो — अशा परिस्थितीत नवीन पिढी खरंच राजकारणात येईल का? आणि देशाचा खरा विकास होईल का?
ज्या कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य ३०–३५ वर्षे पक्ष वाढवण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी आणि समाजासाठी खर्ची घातले, त्यांनाच आज उमेदवारीसाठी अशा टोकाच्या गोष्टी कराव्या लागत असतील, तर ही गोष्ट केवळ लाजिरवाणी नाही तर अंतर्मुख करणारी आहे.

ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, त्यांनाच जर अपमान, उपेक्षा आणि संघर्षाला सामोरे जावे लागत असेल, तर नव्या पिढीने राजकारणात यावं तरी का? आजची तरुण पिढी हे सगळं पाहत आहे आणि त्यातून एक धोकादायक बोध घेत आहे — की प्रामाणिकपणा, निष्ठा आणि त्यागाला किंमत उरलेली नाही.

ही परिस्थिती केवळ दुर्दैवी नाही, तर समाजाच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. कारण जेव्हा राजकारण मूल्यांपासून दूर जाते, तेव्हा समाज दिशाहीन होतो. महाराष्ट्राने नेहमीच वैचारिक परंपरा जपली आहे. इथे संघर्ष झाले, मतभेद झाले, पण सभ्यता आणि संस्कार कायम राहिले. आज मात्र सत्तेच्या हव्यासापोटी ही परंपरा दुर्लक्षित होताना दिसते.

आज प्रश्न उमेदवारीचा नाही, तर नीतीचा, प्रामाणिकतेचा आणि मूल्यांचा आहे. सत्ता क्षणभंगुर असते, पण मूल्यांचा ऱ्हास दीर्घकाळ परिणाम करून जातो. आज आपण गप्प बसलो, तर उद्या इतिहास आपल्याला कठोर प्रश्न विचारेल.

महाराष्ट्राला नाट्यमय गोंधळ नको,
महाराष्ट्राला मूल्याधिष्ठित, जबाबदार आणि प्रामाणिक राजकारण हवे आहे.

वेळीच आत्मपरीक्षण झाले नाही, तर उद्याचा पश्चात्ताप निरर्थक ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button