मोशी स्पाईन रोड सरदार चौक स्कूल बस अपघात.

मोशी | प्रतिनिधी
स्पाईन रोड मोशी येथील सरदार वल्लभाई पटेल चौकात आज एक स्कूल बसचा भीषण अपघात झाला. बस वाहनचालकाचा अचानक ताबा सुटल्याने बस रस्त्यावर पलटी झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. सुदैवाने, अपघाताच्या वेळी बसमध्ये कोणतेही विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. बस चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे काही काळ स्पाईन रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वाहनाचा तांत्रिक बिघाड की चालकाची चूक, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये स्कूल बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी : शाम शिरसाठ पुणे