भोसरी आळंदी रोडवर ‘सुलभ शौचालय’चा बोर्ड आहे; मात्र शौचालयच गायब!

भोसरी आळंदी रोडवर ‘सुलभ शौचालय’चा बोर्ड आहे; मात्र शौचालयच गायब!
भोसरी आळंदी रोड हा भोसरी परिसरातील प्रमुख बाजारपेठ असून दिघी, चऱ्होली, आळंदी, चाकण तसेच भोसरीतील विविध भागांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी येथे येत असतात. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी सुलभ शौचालय उभारण्यात आले होते. यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता.
मात्र सुमारे पाच वर्षांपूर्वी याच जागेत ‘पे अँड पार्क’ इमारतीचे काम सुरू करण्यात आले. या बांधकामादरम्यान सुलभ शौचालय पाडण्यात आले. विशेष म्हणजे आजही त्या ठिकाणी सुलभ शौचालय असल्याचा बोर्ड लावलेला आहे; प्रत्यक्षात मात्र शौचालय अस्तित्वात नाही.
शौचालय नसल्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांचे, विशेषतः महिलांचे मोठे हाल होत आहेत. पर्याय नसल्याने अनेक ठिकाणी आडोसा दिसेल तिथे लघुशंका करण्याची वेळ नागरिकांवर येत असून परिसरातील स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नागरिकांचा कररूपी पैसा अशा प्रकारे वाया जात असल्याचा आरोप होत असून, शौचालय पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन या ठिकाणी नव्याने सुलभ शौचालय उभारावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
बोर्ड लावलेला असल्यामुळे अनेक नागरिक आजही येथे शौचालय असल्याच्या अपेक्षेने शोधत फिरताना दिसतात. प्रत्यक्षात शौचालयच नसल्याने नागरिकांची निराशा होते आणि वेळ व गैरसोयीचा सामना करावा लागतो.
पालिकेने जसे सुलभ शौचालय पाडले, तसे किमान दिशादर्शक व माहिती देणारा बोर्ड तरी तात्काळ काढायला हवा होता. अस्तित्वात नसलेल्या सुविधेचा बोर्ड लावून ठेवणे म्हणजे नागरिकांची दिशाभूल करण्यासारखे असून हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे प्रतीक आहे.
एकीकडे स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात केली जाते, तर दुसरीकडे मूलभूत सुविधांचा असा गोंधळ नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेशी थेट खेळ करणारा ठरत आहे. पालिकेने त्वरित हा दिशाभूल करणारा बोर्ड हटवावा आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

