हिंदू महासभेची पुणे महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर
हिंदू महासभेची पुणे महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर

पुणे | प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
अखिल भारत हिंदू महासभेने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. हिंदू महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभा पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरत असून हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारित विकासात्मक राजकारण हा पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या यादीत विविध क्षेत्रातील सुशिक्षित व सामाजिक जाण असलेल्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत व्यावसायिक, पत्रकार, गृहिणी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असून शहराच्या दैनंदिन समस्या आणि नागरी सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये विवेक परदेशी (प्रभाग २३ ड), प्रशांत भालेराव (प्रभाग २४ ड), सूर्यकांत कुंभार (प्रभाग २५ ब), तृप्ती तारे (प्रभाग २५ क), अजित जोशी (प्रभाग २५ ड), नितीन शुक्ल (प्रभाग ३४ ड), विद्या घटवाई (प्रभाग ३५ ब) आणि राजेंद्र देशपांडे (प्रभाग ३७ ड) यांचा समावेश आहे.
“आम्ही मतदारांची फसवी किंमत करणार नाही. ना यात्रा काढणार, ना करमणुकीचे कार्यक्रम घेणार. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि पुणे शहराचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल,” असा विश्वास हिंदू महासभेकडून व्यक्त करण्यात आला.
या पत्रकार परिषदेला हिंदू महासभेचे प्रदेश सहकार्यवाह मनोज तारे, प्रदेश सरचिटणीस नितीन शुक्ल, प्रदेश संघटन प्रमुख उमेश कुलकर्णी, प्रदेश महिला समन्वयक सौ. अदिती जोशी, महिला आघाडी अध्यक्ष शिल्पा भोसले–बुडुख , ॲड नीता जोशी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. उर्वरित प्रभागांसाठी उमेदवारांची पुढील यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

