भोसरी–आळंदी रोडचा श्वास गुदमरतोय

भोसरी–आळंदी रोडचा श्वास गुदमरतोय
भोसरी भागातील रचनेनुसार प्रभाग क्रमांक ५ हा आळंदी रोडच्या दोन्ही बाजूंनी विस्तारित असून हा मार्ग पूर्वीपासूनच प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. दिघी, चऱ्होली, आळंदी आदी भागांकडे जाणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्याने दिवसभर प्रचंड वर्दळ असते. गेल्या काही वर्षांत परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले, मात्र त्यानुसार रस्त्याची रुंदी किंवा वाहतूक व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.
वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रस्ता मात्र अरुंदच राहिल्याने रोजच्या रोज नागरिकांना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सकाळ-संध्याकाळच्या वेळेत तर परिस्थिती अधिकच बिकट होते. रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि कामगार वर्ग यांनाही याचा मोठा फटका बसत आहे.
यात भरीस भर म्हणून फेरीवाले व हातगाडीवाले यांनी रस्त्याचा मोठा भाग अडवून धरला आहे. महानगरपालिकेने अधिकृत ‘हॉकर झोन’ तयार करूनही अनेक फेरीवाले तिकडे स्थलांतरित होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे “यामागे नेमकी कोणाची शक्ती आहे?” असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. फूटपाथवरून चालणे तर दूरच, अनेक ठिकाणी थेट रस्त्यावरच दुकाने थाटल्याने वाहतुकीचा प्रवाह आणखी संथ झाला आहे.
दुपारच्या वेळेत शाळेच्या बसेस, खासगी व्हॅन आणि कामगार वाहतूक करणारी वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी कमालीची वाढते. उड्डाणपुलाखाली सिग्नल यंत्रणा उपलब्ध असतानाही ती अनेकदा बंद अवस्थेत असल्याने वाहतूक नियमन पूर्णपणे कोलमडले आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, भोसरी–आळंदी रोडवरील या गोंधळाला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
प्रतिनिधी -विजय अडसूळ
