सिडको घरांच्या किमती १०% कमी; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
सिडको घरांच्या किमतींमध्ये १०% कपात
नागपूर: हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही सवलत विशेषतः EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आणि LIG (कमी उत्पन्न गट) प्रवर्गातील घरांसाठी लागू होणार आहे.
नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या नोड्समधील सुमारे १७ हजार घरांच्या किमती कमी होणार आहेत. “ही घरे सर्वसामान्यांसाठी आहेत. सध्याच्या किमती परवडत नसल्याने १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, दोन महिन्यांत घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
या निर्णयामुळे हजारो मध्यम व अल्प उत्पन्न कुटुंबांना परवडणाऱ्या दरात घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


