बिबट्यांच्या वाढत्या हालचालीवर वनमंत्र्यांचे विधान: “बिबट्यांसाठी शेळ्या-मेंढ्यांचे खुराक द्या” सूचनेवर प्रश्नचिन्ह

बिबट्यांच्या वाढत्या हालचालीवर वनमंत्र्यांचे विधान: “बिबट्यांसाठी शेळ्या-मेंढ्यांचे खुराक द्या” सूचनेवर प्रश्नचिन्ह
पुणे – राज्यातील अनेक भागांत बिबट्यांची मानवी वस्तीकडे वाढती वर्दळ पाहता तज्ज्ञांकडून वैज्ञानिक अभ्यासाची मागणी होत असताना, वनमंत्री यांनी “बिबट्यांसाठी शेळ्या-मेंढ्यांचे खुराक उपलब्ध करा” अशी सूचना दिल्याचे समोर आले आहे. या विधानावर पर्यावरणप्रेमी व वनतज्ज्ञांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा उपाय अवैज्ञानिक आणि धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बिबट्यांना कृत्रिमरीत्या अन्न पुरवणे म्हणजे त्यांना त्या भागात स्थिर करण्यासारखे आहे. यामुळे माणूस–प्राणी संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो.
वनक्षेत्र कमी होणे, जंगलातील शिकारी प्रजातींची घट, गावांमधील भटक्या कुत्र्यांची वाढ आणि कचर्याचे व्यवस्थापन अशा मूळ कारणांकडे दुर्लक्ष करून “शेळ्या-मेंढ्या द्या” असा उपाय सुचवणे म्हणजे समस्येवर तात्पुरती आणि चुकीची प्रतिक्रिया असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यातील बिबट्यांच्या हालचाली, लोकसंख्या, त्यांच्या आहारातील बदल, कुत्र्यांची संख्या आणि मानवी वसतीजवळच्या पर्यावरणीय स्थिती यावर तत्काळ वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.
नागरिकांनी बिबट्यांच्या दर्शनाच्या घटना वाढत असल्यास घाबरून न जाता वनविभागाशी संपर्क साधावा, अनधिकृतपणे प्राण्यांना अन्न देऊ नये, अशी विनंतीही करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

