एमपीएससी गट ‘ब’ पूर्व परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख ४ जानेवारी २०२६
एमपीएससी गट ‘ब’ पूर्व परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख ४ जानेवारी २०२६
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. २१ डिसेंबर २०२५ रोजी होणारी ही परीक्षा आता ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे.
यंदा पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी अशा पदांसाठी एकूण ६७४ जागांची जाहिरात करण्यात आली आहे.
परीक्षा पुढे ढकलण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्याच दिवशी महाराष्ट्रातील नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीदरम्यान जिल्हाधिकारी व महसूल कर्मचारी मोठ्या प्रमाणावर गुंतणार असल्याने परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता होती.
तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये मतमोजणी केंद्रे आणि परीक्षा केंद्रे एकमेकांच्या जवळ असल्याने लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, विजय मिरवणुका यांसारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रतिनिधी – उमेश कुलकर्णी, पुणे

