भोसरी एमआयडीसीत भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू भोसरी, दि. ६ डिसेंबर २०२५

भोसरी एमआयडीसीत भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू
भोसरी, दि. ६ डिसेंबर २०२५
भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला. बांधकाम सुरू असताना हादऱ्याने शेजारील कंपनीची तब्बल २५ फूट उंच भिंत अंगावर कोसळल्याने ही घटना घडली. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.
मृत कामगाराचे नाव मारुती राघोजी भालेराव (वय ३२, रा. रानुबाई मळा, चाकण) असे आहे. भालेराव आणि जेसीबी चालक हे दोघे ब्रेकर मशीनच्या सहाय्याने लेव्हलिंगचे काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक झालेल्या हादऱ्याने शेजारील कंपनीची भिंत आणि शेड कोसळून भालेराव हे खाली गाडले गेले. जेसीबी चालकाने तातडीने आरडाओरडा करून मदत मागितली.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलाचे रेस्क्यू पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. भालेराव यांना गंभीर अवस्थेत वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के. एस. पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रतिनिधी विजय अडसूळ

