वालसावंगी येथील पोलीस पाटील पद रिक्त गावकऱ्यात नाराजी
वालसावंगी येथील पोलीस पाटील पद रिक्त
गावकऱ्यात नाराजी
वालसावंगी : प्रतिनिधी श्री महेंद्र बेराड, भोकरदन तालुका
भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वालसावंगी येथे पोलीस पाटील पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य शासनाने मागील महिन्यात पोलीस पाटील पदांसाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण करून गुणवत्तेनुसार अनेक गावांत नियुक्त्या केल्या असल्या, तरी वालसावंगी येथे अद्यापही पोलीस पाटील नेमणूक झालेली नाही.
पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. त्यांची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांद्वारे केली जाते. गावातील गुन्हेगारी स्थिती, वाद–विवाद, सामाजिक वातावरण, आरोग्य तसेच इतर संवेदनशील विषयांबाबत प्रशासनाला योग्य माहिती देण्याचे काम पोलीस पाटील करतात. त्यामुळे हे पद रिक्त असल्याने गावातील अनेक तंटे आणि वाद सोडविण्यासाठी योग्य अधिकाऱ्याचा अभाव जाणवत आहे.
यापूर्वी महिलांसाठी राखीव असलेल्या या पदासाठी एसटी प्रवर्गातील काही महिला उमेदवार अपात्र ठरल्याने निवड प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.
गावातील एकत्रित वालसावंगी आणि सुंदरवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या तब्बल सतरा हजारांवर आहे. एवढ्या मोठ्या गावात पोलीस पाटील नसल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याची गावकऱ्यांची भावना आहे.
सामाजिक कार्यकर्ते यशवंत जाधव यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत म्हटले आहे की –
“वालसावंगी हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. येथे पोलीस पाटील पदासाठी एसटी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सुटले होते. मात्र काही कारणास्तव महिला उत्तीर्ण झाल्या नाहीत आणि पद रिक्त राहिले. जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांनी लक्ष घालून याच एसटी महिला आरक्षणानुसार पोलीस पाटील पदाची नियुक्ती करावी. आरक्षण बदलल्यास एसटी समाजावर अन्याय होईल.


