स्मार्ट’’ पिंपरी-चिंचवडमध्ये फुटपाथ हरवले! शोधणाऱ्यास बक्षीस!’
‘ स्मार्ट’’ पिंपरी-चिंचवडमध्ये फुटपाथ हरवले! शोधणाऱ्यास बक्षीस!

नागरिक त्रस्त : अतिक्रमण, बेशिस्त नियोजनाचा कहर
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी फुटपाथ हरवल्याची जाहीर घोषणा करत महापालिका प्रशासनाच्या ‘स्मार्ट’ (?) नियोजनावर घणाघाती टीका केली आहे. “फुटपाथ शोधा आणि बक्षीस मिळवा,” अशी उपरोधिक हाक देत पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाने (फेडरेशन) आपल्या संतप्त भावना व्यक्त करत एकप्रकारे प्रशासनाला चिमटा घेतला आहे.
महापालिकेने शहरात ठिकठिकाणी पादचारी मार्ग उभारले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना त्यावरून चालणे अशक्य बनले आहे. कुठे रस्त्यांच्या कडेला उभारलेले दुकानदारांचे अतिक्रमण, तर कुठे फेरीवाल्यांची भरलेली गर्दी… परिणामी, पादचाऱ्यांचा पदपथावरून चालण्याचा हक्क अक्षरशः हिरावला गेला आहे. महासंघाने म्हटले आहे की, “महापालिकेने जणू समर्थांच्या उक्तीप्रमाणे ‘दिसामाजी काहीतरी बांधीत जावे’ या मंत्राला अनुसरून फुटपाथांचे काम केले आहे, पण त्यावरून पादचारी चालू शकणार नाहीत याचीही दक्षता घेतली आहे.”
महासंघाने दिलेल्या विधानात स्पष्ट करण्यात आले आहे की, “कोणताही नागरिक जर सलग दोनशे मीटर अडथळेविना महापालिकेच्या फुटपाथवरून चालून दाखवेल, तर आम्ही त्याचा मॅरेथॉन विजेत्यासारखा जाहीर सत्कार करू.”
तसेच, महासंघाने अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन, पी.सी.एम.सी. आणि इतर संबंधित यंत्रणांना ठोस कारवाईसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे. “नागरिकांनी कररूपात दिलेल्या पैशातूनच या सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा लाभ नागरिकांनाच निर्वेधपणे मिळालाच पाहिजे,” असा ठाम आग्रहही त्यांनी धरला आहे.
फुटपाथ की अतिक्रमणाचा अड्डा?
रुंद पदपथांचे नियोजन करताना महापालिकेने वाहनचालकांसाठी रस्ते मात्र अरुंदच ठेवले. या पदपथांवर दुकानांचे अतिक्रमण, फेरीवाल्यांचे अडथळे, उत्सवांच्या निमित्ताने मांडलेले स्टॉल, भिकाऱ्यांची गर्दी आणि अवैध पार्किंग यामुळे शहरातील अनेक भाग ‘भूतबाजार’ वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीनिमित्त उभारण्यात आलेले फटाके स्टॉल हे अग्निशमन नियमांचा भंग करत असल्याचा आरोपही महासंघाने केला आहे. “कधीही दुर्घटना होऊ शकते. मालमत्तेच नव्हे तर जीवितहानीचीही शक्यता नाकारता येत नाही,” असा इशारा देत या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महासंघाने या अराजकतेला कंटाळून नागरिकांनी आता अतिक्रमण केलेल्या फटाके विक्रेत्यांवर आणि इतर दुकानांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले आहे.
“शहरात पादचारी मार्ग उभारले खरे, पण त्यावरून चालायला पाय ठेवायलाही जागा नाही, ही आपल्या ‘स्मार्ट’ नियोजनाची शोकांतिका आहे. नागरिकांच्या हक्कांच्या अडथळ्यावर कारवाई झाली नाही, तर उद्या रस्तेही विकले जातील!” आम्ही स्मार्ट सिटीत राहतोय, की स्वप्नात असा प्रश्न आहे.
असे महासंघाच्या वतीने– सचिन लोंढे,( उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.) यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रतिनिधी – विजय अडसूळ

