मनाचे श्लोक” या नावाने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाविरोधात हरकत
पुणे, दि. ८ ऑक्टोबर २०२५ –
“मनाचे श्लोक” या नावाने प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाच्या नावावरून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ब्राह्मण महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महासंघाचे प्रांतिक अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC) यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
डॉ. बोधनी यांनी म्हटले की, “मनाचे श्लोक हे श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेले पवित्र वाङ्मय आहे, जे समाजाच्या आत्मविकासाचे आणि अध्यात्मिक प्रेरणेचे प्रतीक आहे. अशा पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी करणे हे धार्मिक भावना दुखावणारे असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ अंतर्गत गुन्हा ठरू शकतो.”
महासंघाच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाचे शीर्षक त्वरित पुनर्विचारासाठी घेण्यात यावे आणि विषयाची योग्य चौकशी व्हावी. “आम्ही कलात्मक अभिव्यक्तीचा विरोध करत नाही, मात्र धार्मिक प्रतीकांचा व्यावसायिक वापर किंवा चुकीच्या अर्थाने सादरीकरण झाल्यास समाजात तणाव निर्माण होऊ शकतो,” असेही डॉ. बोधनी यांनी नमूद केले.
महासंघाने शासनाकडे मागणी केली आहे की अशा संवेदनशील विषयांवर भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ठोस मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत आणि चित्रपट उद्योगालाही जबाबदारीची जाणीव करून द्यावी.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429



