“जीवाला जीव देणारे माणसे हेच खरं सोनं” – उद्धवजी ठाकरे यांची शिवाजी पार्क मेळाव्यात सरकारवर टीका

शिवाजी पार्कवरील उद्धव जी ठाकरे यांचा दसरा मेळावा
“जीवाला जीव देणारे माणसे हेच माझं खरं सोनं” – उद्धव ठाकरे
मुंबई – शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “जीवाला जीव देणारे माणसे हेच माझं खरं सोनं आहे,” असे म्हणत त्यांनी जनतेच्या निष्ठेचं कौतुक केलं.
शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या शेतीत चिखल झालाय, त्यांनी काय खायचं हा मोठा प्रश्न आहे. आमचं सरकार नाहीये, पण शिवसेनेतर्फे शक्य ती मदत करू. सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
मणिपूर प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ठाकरे म्हणाले, “मणिपूरमधला ‘मणी’ त्यांना दिसला; पण तेथील लोकांच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाहीत. लोकांचा आक्रोश त्यांना जाणवला नाही,” अशी टीका त्यांनी केली.
केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्ला करत ते म्हणाले, “आज म्हणता जीएसटी कमी केला. पण हा लावला कोण? तुम्हीच. सामान्य माणसाला त्रास देणारा जीएसटी आणलात आणि आता कमी केला म्हणून उपकार केल्यासारखं दाखवता,” असे ठाकरे म्हणाले.
क्रिकेट वरून भाजपवर निशाणा साधत त्यांनी म्हटले, “गोळ्या झाडणाऱ्यांसोबत हातमिळवणी करून क्रिकेट खेळलं जातं. हा देशाच्या अपमान आहे.”
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करत ठाकरे म्हणाले, “हिंदूच्या मुद्द्यावरून आमच्यावर टीका करू नका; नाहीतर सर्व भाजप नेत्यांचे टोप्या घातलेल्या फोटोचे प्रदर्शन भरवले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
भाजपवर निशाणा साधत ठाकरे म्हणाले, “भाजप आता अमीबा झाला आहे. जिकडे लागेल तिकडे युती करतो.”
शिवसैनिकांना आवाहन करत ठाकरे म्हणाले, “अनेक जण शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरे सोनं आमच्याकडेच आहे. जे फुटतं ते पितळ असतं; शिवसैनिक मात्र जीवाला जीव देणारे आहेत — त्यांच्या बळावरच आपण उभे आहोत.”
प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी, पुणे
