Maharashtra

खासगी क्षेत्रातील कामकाजाचे तास वाढवण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव.

पिंपरी चिंचवड प्रतीनिधी : महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचे तास वाढविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. सध्या लागू असलेली दररोजच्या कामकाजाची ९ तासांची मर्यादा वाढवून ती १० तास करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी बुधवारी दिली.

आंतरराष्ट्रीय कामगार कायद्यांच्या मानकांशी सुसंगत राहावे आणि कार्यस्थळांवर लवचिकता निर्माण व्हावी या उद्देशाने हे बदल सुचवले आहेत. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कामगार विभागाने हा प्रस्ताव सादर केला. या अनुषंगाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (रोजगाराचे नियमन व सेवा अटी) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

प्रस्तावानुसार महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची मुभा दिली जाणार असून, सध्या १० कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित असलेल्या आस्थापनांना कायद्याच्या कक्षेतून वगळले जाते. ही मर्यादा वाढवून २० कर्मचाऱ्यांपर्यंत करण्याचाही विचार आहे.

कामगार विभागाने सुचविलेल्या पाच प्रमुख सुधारण्यात तीन महिन्यांत परवानगीयोग्य ओव्हरटाइमची मर्यादा १२५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढविणे आणि सलग कामकाजाच्या तासांमध्ये सक्तीची विश्रांती घेण्याची तरतूद यांचा समावेश आहे.

“या बदलांमुळे विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर कामाचे वातावरण निर्माण होईल. तसेच कामगार व नियोक्त्यांच्या दीर्घकालीन अडचणी दूर करण्यास मदत होईल,” असे कामगारमंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले. सरकार अजूनही या प्रस्तावावर विचारविनिमय करत असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button