मोरया गोसावी क्रीडांगण शौचालयांची दयनीय अवस्था
शौचालयांची दयनीय अवस्था — प्रशासनाची डोळेझाक, जबाबदार कोण?
केशवनगर, चिंचवड | दि. २४ जून २०२५
केशवनगर, चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगण हे परिसरातील नागरिक, महिला, युवक-युवतींसाठी सकाळ-संध्याकाळी व्यायाम, चालणे, आणि खेळासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी नागरिकांच्या गरजांचा विचार करून काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक सुलभ शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र आज काही महिन्यांतच या सुविधा अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचल्या आहेत.
सदर शौचालयामध्ये कमोड्स तुटलेले, फॅन तुटलेला आहे,पाण्याच्या बादल्या मोडकळीस आलेल्या, तसेच स्वच्छतेचा अभाव आणि दुरुस्तीची कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे परिसरातील महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
या तक्रारी नागरिकांनी महावितरण समितीचे सदस्य श्री. मधुकर बच्चे यांच्याकडे मांडल्या. त्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता अनेक गैरसोयी आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे निदर्शनास आले. शौचालयाच्या नूतनीकरणासाठी वापरण्यात आलेले साहित्य हे अत्यल्प दर्जाचे असून, त्याचा टिकाऊपणाशी संबंध नाही, असा आरोप यावेळी त्यांनी केला.
यावर प्रतिक्रिया देताना श्री. मधुकर बच्चे म्हणाले,
> “सार्वजनिक सुविधा ही नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित आहे. त्यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जबाबदार अधिकाऱ्यांनी दर्जेदार साहित्याचा वापर करणे अपेक्षित होते. नागरिकांची गैरसोय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होत असल्यास त्याला उत्तरदायी कोणी तरी असले पाहिजे.”
या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि निवेदन श्री. बच्चे यांनी ‘ब’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी श्री. किरणकुमार मोरे यांना दिले. यावर श्री. मोरे यांनी त्वरित कारवाईचे आश्वासन देत सांगितले की,
> “या संदर्भात संबंधित ठेकेदार व यंत्रणांची चौकशी करण्यात येईल. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी योग्य पावले उचलली जातील.”
या प्रकरणावरून स्पष्ट होते की, सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सुविधा या केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्षात दर्जेदार असाव्यात, यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे