स्मार्ट सिटी की स्मार्ट गोंधळ? – रक्षक चौक परिसरात नागरिकांचा संताप पिंपरी चिंचवड, 5 जून:

स्मार्ट सिटी की स्मार्ट गोंधळ? – रक्षक चौक परिसरात नागरिकांचा संताप
पिंपरी चिंचवड, 5 जून:
स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, फूटपाथ आणि सायकल ट्रॅक तयार केले जात आहेत. मात्र या कामांमधील नियोजनाचा अभाव आणि प्रत्यक्ष गरजांचा विचार न करता केलेली अंमलबजावणी यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. औंध ते काळेवाडी मार्गावरील रक्षक चौक परिसर हे याचे ठळक उदाहरण ठरत आहे.
या परिसरात फूटपाथची रुंदी वाढवण्यात आली असून काही ठिकाणी ते १५ फूटांपर्यंत वाढवले गेले आहेत. यामुळे मूळ रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहनांची वाहतूक खोळंबते आहे. विशेष म्हणजे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक दुचाकीस्वार थेट फूटपाथवरूनच गाडी चालवत आहेत.
एक स्थानिक रहिवासी म्हणाले, “फूटपाथ ५ फूट पुरेसा होता. उगाच १५ फूट करून रस्त्याचं बॅलन्सच बिघडलं. अपघाताचा धोका वाढलाय.”
तसेच, सायकल ट्रॅकसाठी वेगळ्या रंगाचे रस्ते तयार करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांकडून सायकल वापर जवळपास नाहीसा झाल्याचे चित्र आहे. म्हणून या प्रकल्पावर खर्च झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला असल्याची टीका होत आहे.
याशिवाय, लाखो रुपये खर्चून बांधलेले फूटपाथ आणि रस्ते काही महिन्यांतच पुन्हा तोडले जात आहेत. चुकीचं मोजमाप, नागरिकांच्या गरजांचा विचार न करणे आणि अर्धवट नियोजन यामुळे सार्वजनिक निधीचा मोठा अपव्यय होत आहे.
स्थानिकांचा सवाल: “सायकलच नाहीत, तर ट्रॅक कशाला? आणि विकास हवाच, पण तो शहाणपणानं करा!”
या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांतून प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात असून, या योजनांमध्ये मूळ गरजा, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.
प्रतिनिधी – उमेश कुलकर्णी पुणे 9822548429