“बससेवेचा गोंधळ, पालकांची धावपळ; सिद्धांत कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अडचण”
“बससेवेचा गोंधळ, पालकांची धावपळ; सिद्धांत कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अडचण”
सिद्धांत कॉलेजच्या विद्यार्थ्यांची PMPMLमुळे अडचण; पावसात पालकांना धाव घ्यावी लागली
ता. ४ जून, साडुंब्रे – साडुंब्रे ते निगडी मार्गावर धावणारी PMPML बस सेवा मंगळवारी वारंवार रद्द झाल्याने सिद्धांत कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. एका दिवसात तब्बल तीन वेळा बस सेवा रद्द झाल्याने गैरसोयीची परिसीमा झाली.
विद्यार्थ्यांना सुरुवातीला सांगण्यात आलं की सायंकाळी साडेपाचची बस साडेसहाला येईल. त्यानंतर वेळ साडेसात अशी बदलली गेली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही बस आलीच नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना पावसातच देहूपर्यंत पायपीट करावी लागली आणि तिथून पुढचा प्रवास इतर पर्यायी साधनांनी करावा लागला.
या सगळ्या गोंधळाचा विशेष फटका मुलींना बसला. पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. काही पालकांनी आपली कामं अर्धवट सोडून कॉलेज परिसरात मुलींना आणण्यासाठी धाव घेतली.
श्याम शिरसाट या पालकांनी प्रश्न उपस्थित केला की, “उशीर झाल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला, तर त्याची जबाबदारी PMPML घेणार का?”
या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांनी PMPML प्रशासना बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे
–
महत्त्वाचे मुद्दे:
PMPML बस सेवा एकाच दिवशी तीन वेळा रद्द
चुकीची माहिती देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल
पावसात आणि अंधारात मुलींना चालत प्रवास करावा लागला
पालकांमध्ये संताप; PMPML प्रशासनावर कारवाईची मागणी
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे 9822548429