Maharashtra

येडेश्वरी यात्रेत सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद; १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त;

येडेश्वरी यात्रेत सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद; १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त;

जि. धाराशिव. दि. 5 एप्रिल 2026:
धाराशिव जिल्ह्यातील येडेश्वरी यात्रेदरम्यान महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे यात्रेतील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली आहे.

३ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक यात्रेत गस्त घालत होते. यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली होती.

दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल तपासात आरोपींची ओळख अनिल शेषेराव शिंदे (वय ३४), सुनीता अनिल शिंदे (वय २९) व हिराबाई रमेश शिंदे (वय ४०, सर्व रा. इंदिरानगर, पाथरी, जि. परभणी) अशी पटली.

पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता आरोपी अनिल शिंदे याच्या ताब्यातून चार सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले. चौकशीत आरोपींनी यात्रेतील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून ते एकत्र करत असल्याची कबुली दिली.

या कारवाईत एकूण सुमारे १ लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस कर्मचारी शोभा बांगर, पोलीस कर्मचारी मेहबूब अरब व चालक रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

येडेश्वरी यात्रेत अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी वचक बसवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button