टाकळीभानमध्ये पाण्याच्या टाकीची पडझड; ग्रामस्थांचा संताप, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप.
टाकळीभानमध्ये पाण्याच्या टाकीची पडझड; ग्रामस्थांचा संताप, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप.

टाकळीभान प्रतिनिधी | श्रीरामपूर तालुका
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान या मोठ्या गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीची गंभीर पडझड सुरू असून ग्रामपंचायत सत्ताधारी, पदाधिकारी आणि प्रशासन यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
टाकळीभान हे सुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्या असलेले मोठे गाव असून पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या निधीतून विविध ठिकाणी टाक्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, बाजार समिती आवारातील एक पाण्याची टाकी गेल्या दोन वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून तिची पडझड वाढत चालली आहे. याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गावाचा पाणीपुरवठा गोविंद सागर जलाशयावर अवलंबून असून परिसरातील १४ गावांची योजना याच जलाशयावर आधारित आहे. तरीही, अनेक टाक्यांमध्ये पाणी पोहोचत नसल्यामुळे त्या टाक्या निष्प्रयोजन ठरत आहेत. शासनाचा मोठा निधी खर्चून उभारलेल्या या टाक्यांचा ग्रामस्थांना काहीच फायदा होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन सरपंच अर्चना रणनवरे यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. सध्या टाकीची पडझड अधिकच वाढली असून तिच्या आसपास आठवडी बाजार भरतो तसेच बाजार समितीचे कामकाज सुरू असते. त्यामुळे टाकीचा काही भाग कोसळल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संभाव्य धोक्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांनी तातडीने दुरुस्ती किंवा नवीन टाकी उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे, श्रीरामपूर

