Maharashtra

टांग्याखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू ; सात टांगा शौकिनांविरोधात गुन्हा दाखल;

टांग्याखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू ; सात टांगा शौकिनांविरोधात गुन्हा दाखल;

जि. नाशिक. ता. (निफाड): दि. 12 एप्रिल 2026;
निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे हरीभुषा बाबा यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या बेकायदेशीर टांगा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात एका ८८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सात टांगा शौकिनांविरोधात निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निफाड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी धंनजय प्रल्हाद जाधव यांनी फिर्याद दिली आहे. दि.६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ ते ४.३० वाजेच्या दरम्यान नांदुर्डी गावातील कुंदेवाडी ते नांदुर्डी आतील शिव रस्त्यावर हरीभुषा बाबा यात्रेनिमित्त टांगा शर्यत भरविण्यात आली होती. या शर्यतीसंदर्भात पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती तसेच यापूर्वी प्रशासनाने शर्यत न भरविण्याबाबत नोटीसही दिली होती. तरीदेखील आरोपींनी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता निष्काळजीपणे घोडा व बैलांच्या टांग्यांची शर्यत आयोजित केली. शर्यतीदरम्यान नांदुर्डी येथील रघुनाथ विठ्ठल शिंदे या ८८ वर्षीय वृद्धाचा टांग्याखाली येऊन मृत्यू झाला.

संबंधित प्रकाराची पोलिसांना माहिती न देता प्राण्यांना निर्दयतेने वागणूक दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी सुभाष बबन खापरे, राहुल भगवान खापरे, संजय कारभारी आहेर, मधुकर त्र्यंबक कुभार्डे, तानाजी मुरलीधर खापरे, किशोर कैलास निकम व सोपान निवृत्ती देवकर (सर्व रा. नांदुर्डी, ता. निफाड या सात आरोपींच्या विरोधात निफाड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २२३, २३९, ३(५) तसेच प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत कलम ११(१) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कपालेश्वर ढिकले अधिक तपास करीत आहेत.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button