Maharashtra

SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी माहिती अद्ययावत करावी; ऑनलाईन सुविधांचा वापर करण्याचे महेंद्र बेराड यांचे आवाहन*

*SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदारांनी माहिती अद्ययावत करावी; ऑनलाईन सुविधांचा वापर करण्याचे महेंद्र बेराड यांचे आवाहन*

पारध (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू असून नागरिकांनी आपली माहिती वेळेत तपासून दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेंद्र बेराड सर यांनी केले आहे.

महेंद्र बेराड यांनी सांगितले की, SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांची माहिती 2002 च्या मतदार यादीशी लिंक करणे आवश्यक असल्यामुळे प्रत्येक मतदाराने त्या काळातील आपली नोंद शोधून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी मतदार संघाचे नाव व क्रमांक, यादी क्रमांक तसेच अनुक्रमांक (Serial Number) शोधणे आवश्यक आहे.

विशेषतः 2002 मध्ये ज्यांची नावे मतदार यादीत नव्हती, अशा विवाहित महिलांनी आपल्या माहेरच्या (आई, वडील, आजी किंवा आजोबा) नावाच्या आधारे संबंधित माहिती शोधून ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारांना ही माहिती शोधण्यासाठी NVSP Voter Search Portal या अधिकृत संकेतस्थळाचा उपयोग करता येणार आहे.

तसेच, मतदान ओळखपत्रातील (Voter ID) नाव, पत्ता, जन्मतारीख आदी तपशील अचूक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर जाऊन ऑनलाईन दुरुस्ती करून घ्यावी.

घरी बसूनही ECINet या मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान कार्डातील दुरुस्ती, नवीन नोंदणी व इतर सेवा सहज उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी 2002 मधील अनुक्रमांक (स्वतःचा किंवा पालकांचा) व आवश्यक कागदपत्रे पूर्वतयारी म्हणून ठेवावीत. तसेच SIR प्रक्रियेदरम्यान प्रशासन, शिक्षक व बीएलओ (BLO) यांना सहकार्य करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“हे अभियान सध्या सुरू असून प्रत्येक नागरिकाने वेळेत आपली माहिती तपासून घ्यावी. कोणतीही अडचण आल्यास आपल्या भागातील बीएलओ, CSC केंद्र किंवा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधावा,” असे आवाहन महेंद्र बेराड यांनी केले.

पारध-पिंपळगाव रेणुकाई सर्कल मधील व परिसरातील सर्व नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदार नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावत कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button