शेतकरी संघटनेचेआकारी पडीत जमिनीसाठी जल भरो आंदोलन.
शेतकरी संघटनेचेआकारी पडीत जमिनीसाठी जल भरो आंदोलन
टाकळीभान प्रतिनिधी:-श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या हरेगाव मळा ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांचे आपल्या हक्काच्या वडिलोपार्जित जमिनी सरकारने त्वरित परत कराव्यात, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये ‘जेल भरो’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
शेती महामंडळाच्या हरेगाव मळा परिसरातील शिरसगाव, ब्राम्हणगाव, वडाळा महादेव, उंदिरगाव, खैरी, निमगाव, माळवाडगाव मुठेवाडगाव, खानापूर या नऊ गावातील शेतकऱ्यांच्या वडीलोपार्जित जमिनी १९१८ साली ब्रिटिश सरकारने भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विकसित करून पिकविणाऱ्यासाठी ३० वर्षांच्या कराराने परत करण्याचे अँग्रीमेंट केले होते. पुढे १९४८ च्या स्वातंत्र्यानंतर राज्य सरकारने या जमिनीवर शेती महामंडळ स्थापन करून खंडकरी शेतकऱ्यांचे जमिनी समाविष्ट केल्या. या खंडकरी शेतकऱ्यांचे जमिनी राज्य सरकारने परत केल्या. मात्र आकारी पडीक जमिनी अद्याप ताब्यात ठेवल्या आहेत. या जमिनीचे मुळ शेतकऱ्यांचे वारस मालक आहेत. सरकारने अधिग्रहित केलेल्या नाहीत. हे उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने आठ आठवड्यांत जमिनी परत देण्याचे आदेश १४ऑगष्ट २०२५ च्या निकालात राज्य सरकारला दिले.
त्यावेळचे ना. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील महसूल मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनी परत मिळवून देण्यासाठी ना. विखे पाटील हे आकारी पडीत शेतकऱ्यांचे बाजूने असल्याने हा लढा आतापर्यंत यशस्वी झाला असल्याचे आकारी पडीत चळवळीचे मार्गदर्शक अॅड. अजित काळे हे देखील वेळोवेळी आपल्या भाषणातून स्पष्ट करत असतात. मात्र नव्याने अस्तित्वात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सरकारने. राज्यपाल महोदय प्रस्तावावर स्वाक्षरी करत नाही. या सबबीखाली हा प्रश्न प्रलंबीत ठेवला आहे. निव्वळ हा प्रश्न प्रलंबीतच ठेवला नाही. तर या जमिनी मोठ्या उद्योग व्यवसायास देण्याचा घाट घातला आहे.
आता सरकारला जाग हा लढा आणण्यासाठी शांततेच्या मार्गाने रस्त्यावरची लढाई लढून अॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्याचा निर्णय ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांनी घेतला आहे. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ते ९ गावात जाऊन बैठका घेऊन जनजागृती करत आहे. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर

