पोलीसांना हेल्मेट सक्ती; नियमभंगावर दंड व सेवापुस्तकात नोंद
पोलीसांना हेल्मेट सक्ती; नियमभंगावर दंड व सेवापुस्तकात नोंद
मुंबई, दि. ३ एप्रिल २०२६ : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी हेल्मेट वापर अनिवार्य करण्यात येणार आहे. मा. पोलीस महासंचालकांनी नागपूर येथे घेतलेल्या बैठकीत याबाबत स्पष्ट निर्देश देत सर्व आयुक्तालये व जिल्ह्यांना तातडीने परिपत्रक काढण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीनुसार, मृत्यू किंवा गंभीर जखमी झालेल्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सुमारे ३५ ते ४० टक्के आहे. हेल्मेट वापरल्यास प्राणांतिक अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे निरीक्षण समोर आले आहे. मात्र मुंबई व नागपूर वगळता राज्यातील इतर भागांमध्ये हेल्मेट वापराची अंमलबजावणी समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे.
रस्ता सुरक्षा सर्वेक्षणानुसार, मुंबई व नागपूर येथे ८० टक्क्यांहून अधिक दुचाकीस्वार हेल्मेट वापरतात, तर इतर ठिकाणी हे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी स्वतःच हेल्मेट वापरत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर आता सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा कलम १९४ डी अंतर्गत हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, हेल्मेट न घातलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर आढळल्यास संबंधितांवर दंड वसूल करण्याबरोबरच त्यांच्या सेवापुस्तकात नोंद घेण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस दलाने स्वतःपासून आदर्श घालून देणे आवश्यक असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429