Maharashtra

पारध येथे बालाजी चैत्र नवरात्र उत्सवात आई अंबा भवानी स्वारीने वाढली रंगत

पारध येथे बालाजी चैत्र नवरात्र उत्सवात आई अंबा भवानी स्वारीने वाढली रंगत

पारध/ श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी : येथील बालाजी चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकादशीच्या उत्तर रात्री महादेवाची स्वारी काढण्यात आली. त्यानंतर द्वादशीच्या उत्तर रात्री विष्णू बेराड यांनी साकारलेल्या आई अंबा भवानीच्या स्वारीने संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. या दोन्ही स्वारींमुळे गावात धार्मिक उत्साहाची अनोखी उर्जा निर्माण झाली.

अंबा भवानीच्या स्वारीची सुरुवात रात्री उशिरा झाली असून पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत “पावली” खेळत संपूर्ण गावभर प्रदक्षिणा काढण्यात आली. पारंपारिक दफड्याच्या तालावर आणि “बोल अंबा भवानी की जय”च्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

या भक्तिमय सोहळ्यात सर्व गावकरी, भाविक भक्त, महिला मंडळ तसेच लहान मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. विशेषतः तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या स्वारीला अधिकच आकर्षक रूप दिले. श्री बालाजी मंदिर संस्थानात झालेल्या आरती नंतर गावात स्वारीच्या प्रदक्षिणाला सुरुवात झाली. स्वारीदरम्यान भक्तांनी फुलांचा वर्षाव करत देवीचे स्वागत केले. तसेच महिलांनी घरासमोर रांगोळी काढून स्वारीचे पूजन केले. युवकांनी फटाके फोडून स्वारी समोर जल्लोष साजरा केला.

अंबा भवानी स्वारीची ही परंपरा पारध येथील पारंपरिकरित्या कुलकर्णी घराण्याकडे असून ही परंपरा अनेक वर्षांपासून जतन केली जात आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बालाजी मंदिर संस्थान, पारध बु. यांच्या कमिटीने विशेष परिश्रम घेतले. यामध्ये अध्यक्ष श्री दिलीप तुकाराम बेराड, उपाध्यक्ष श्री देविदास आनंदा तेलंग्रे, सचिव श्री बंकिमचंद्र सुरेश लोखंडे तसेच सदस्य समाधान भिकाजी लोखंडे, श्री गणेश शंकरराव वडगावकर, श्री सुभाष जानुबा तबडे आणि श्री रमेश देविदास गालफडे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

या उत्सवामुळे पारध गावात भक्ती, परंपरा आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button