नारायणगावची यात्रा दिमाखात; भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव रंगणार
नारायणगावची यात्रा दिमाखात; भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव रंगणार
नारायणगाव (प्रतिनिधी)
उत्तर पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा यंदा १३ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वैभव यांचा संगम असलेल्या या यात्रेकडे परिसरातील हजारो भाविकांचे लक्ष लागले आहे.
यात्रेची सुरुवात १३ एप्रिल रोजी पालखी सोहळा व छबिना मिरवणुकीने होणार असून, रात्री तमाशा कार्यक्रमांनी रंगत वाढणार आहे. १४ एप्रिल रोजी देवीचा उत्सव साजरा होऊन लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी मांडव डहाळे व चोळीपातळ अर्पण विधी पार पडणार आहेत. रात्री छबिना मिरवणूक आणि भव्य आतिषबाजीने वातावरण भारावून जाणार आहे.
१६ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात येणार असून पारंपरिक कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे. पुढील दिवसांमध्ये राज्यातील नामांकित तमाशा कलाकारांचे कार्यक्रम सादर होणार आहेत. १७ ते १९ एप्रिल दरम्यान विविध तमाशा फडांची रेलचेल पाहायला मिळणार असून २० एप्रिल रोजी यात्रेची सांगता होणार आहे.
नारायणगाव हे “तमाशा पंढरी” म्हणून ओळखले जात असल्यामुळे या यात्रेत दरवर्षी अव्वल दर्जाचे तमाशा फड सहभागी होतात. तसेच पालखी, लेझीम पथके, झांजपथक आणि ढोल-ताशांच्या गजरात गावात उत्सवाचे वातावरण निर्माण होते.
“ही यात्रा आमच्या गावाची परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन यात्रोत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ: श्री क्षेत्र नारायणगाव व वारुळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे
कालावधी: १३ ते २० एप्रिल २०२६
प्रतिनिधी स्वप्नील लुनावत
