Maharashtra

मापोली परिसरात गारपिटीचा हाहाकार; स्ट्रॉबेरीसह कांदा पिकांचे लाखोंचे नुकसान;

मापोली परिसरात गारपिटीचा हाहाकार; स्ट्रॉबेरीसह कांदा पिकांचे लाखोंचे नुकसान;

जि. पुणे. ता. (मापोली):दि. 06 एप्रिल 2026;
मापोली आणि परिसरातील गावांना काल सायंकाळी अवकाळी पावसासह झालेल्या जोरदार गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या निसर्गाच्या तडाख्यामुळे शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

मापोली परिसर हा स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी ओळखला जातो. सध्या हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना झालेल्या गारपिटीमुळे तयार फळांचे मोठे नुकसान झाले आहे. गारांच्या माऱ्यामुळे फळे सडली असून वेलींचेही नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी रामचंद्र मारुती लोहकरे, विश्वास कावजी लोहकरे, लक्ष्मण लोहकरे, दत्तात्रेय भिवसेन लोहकरे, दादासाहेब किसन करवंदे यांच्यासह अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

स्ट्रॉबेरीसोबतच कांदा पिकालाही मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढलेला कांदा शेतात साठवून ठेवला होता, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे हा कांदा पूर्णपणे भिजला आहे. त्यामुळे तो सडण्याची भीती निर्माण झाली असून उभा कांदाही गारांच्या तडाख्याने आडवा झाला आहे.

“वर्षभर कष्ट करून पीक हाती येण्याच्या वेळीच निसर्गाने घात केला. आता जगायचे कसे?” असा सवाल स्थानिक शेतकरी लक्ष्मण डोंगरू लोहकरे यांनी व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button