Maharashtra

कर्ज व नापिकीच्या विवंचनेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कर्ज व नापिकीच्या विवंचनेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जि. हिंगोली, ता. कळमनुरी | दि. 04 एप्रिल 2026
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथे कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन धांडे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अडीच एकर शेतीवर अवलंबून होता. त्यांच्या वडिलांच्या नावे सुमारे 10 लाख रुपयांचे कर्ज होते. घरातील कर्ता पुरुष म्हणून संपूर्ण जबाबदारी सचिन यांच्यावर होती. कर्जफेडीची चिंता आणि शेतीतील तोट्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते.
यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, याची चिंता ते वारंवार व्यक्त करत होते. कुटुंबीय त्यांना धीर देत होते, मात्र परिस्थिती बदलत नव्हती.
शुक्रवारी (दि. 3) गावात सप्ताहानिमित्त भोजनाचा कार्यक्रम होता. रात्री उशिरा सचिन घरी परतल्यानंतर त्यांनी घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने त्यांच्या पत्नीला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने सचिन यांना खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी गणेश धांडे यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठे व उपनिरीक्षक गणेश घोटके पुढील तपास करीत आहेत.
— विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button