Maharashtra

खोजेवाडी हादरली; गॅस चोरी प्रकरणात कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त;

खोजेवाडी हादरली; गॅस चोरी प्रकरणात कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त;

छत्रपती संभाजीनगर: दि. 04 एप्रिल 2026;
राज्यस्तरीय दक्षता पथकाने गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार परिसरात मोठी कारवाई करत गॅस चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल १ कोटी २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नियंत्रक शिधावाटप अधिकारी चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथक प्रमुख गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वैजापूर रोडवरील हॉटेल साईयशजवळ सापळा रचून पथकाने धाड टाकली असता एलपीजी टँकरचे सील तोडून गॅसची चोरी सुरू असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान एच.पी. कंपनीचे दोन टँकर (MH 43 K 5921 व MH 43 CK 5747) जप्त करण्यात आले. या टँकरमध्ये एकूण ३५,२२० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता. तसेच १९.२ किलोचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर, १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर आणि ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर असा एकूण २६ सिलेंडरचा साठाही जप्त करण्यात आला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला गॅस साठा सुमारे २,४८० कुटुंबांची महिनाभराची गरज भागवू शकला असता. त्यामुळे ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटचे इतर धागेदोरे शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. राज्यस्तरीय दक्षता पथकाने इंधन चोरी व साठेबाजीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याचा इशाराही दिला आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button