Maharashtra

जत तालुक्यात २४ तासांत दोन खून; परिसरात दहशतीचे वातावरण;

जत तालुक्यात २४ तासांत दोन  खून; परिसरात दहशतीचे वातावरण;

सकाळी महिलेवर ॲसिड हल्ला, तर दुपारी जमिनीच्या वादातून तरुणाची हत्या

जि. सांगली. (जत):दि. 31मार्च 26
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात अवघ्या २४ तासांत खुनाच्या दोन धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सकाळी एका विवाहित महिलेचा ॲसिड टाकून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, दुपारी एका ४० वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडांमुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जत-बिळूर रस्त्याजवळील एका मंगल कार्यालयाजवळ श्रीधर नीलगोंडा यडगोड (वय ४०) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या नाक, चेहरा आणि पाठीवर वर्मी घाव घातल्याने श्रीधर यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित जमिनीचा वाद गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरवे, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय कुलकर्णी आणि सुनील वानखंडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

नागरिकांमध्ये संताप

एकाच दिवसात झालेल्या दोन खुनांच्या घटनांमुळे जत तालुक्यातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

पत्रकार:विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button