जत आगारात एसटीच्या स्मार्ट कार्डासाठी प्रवाशांची लूट; पावती १९९ रुपयांची,वसुली २५० रुपयांची!
जत आगारात एसटीच्या स्मार्ट कार्डासाठी प्रवाशांची लूट; पावती १९९ रुपयांची,वसुली २५० रुपयांची!
जत (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी बंधनकारक केलेल्या ‘एनसीएमसी’ (NCMC) स्मार्ट कार्डाच्या नावाखाली जत आगारात प्रवाशांची सर्रास लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. अधिकृत पावती १९९ रुपयांची असताना, एजंटकडून प्रवाशांकडून २५० रुपये उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वळसंग (ता. जत) येथील काही महिला प्रवासी जत आगारात नवीन स्मार्ट कार्ड काढण्यासाठी गेल्या होत्या. तेथील अधिकृत एजंट याने कार्डासाठी प्रत्येकी २५० रुपये वसूल केले.मात्र, जेव्हा प्रवाशांना पावती मिळाली,तेव्हा त्यावर केवळ १९९ रुपये १६८ रुपये फी + ३१ रुपये GST असे नमूद होते.प्रवाशांनी ५१ रुपये जास्तीचे का घेतले,असे विचारले असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. विशेष म्हणजे, या ५१ रुपयांचा कोणताही रिचार्ज Top-up देखील कार्डमध्ये करण्यात आला नव्हता.हा प्रकार केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून,आगारात येणाऱ्या प्रत्येक गरजू प्रवाशाकडून अशाच प्रकारे ५० ते ६० रुपये जास्तीचे उकळले जात असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने सवलतीच्या प्रवासासाठी हे कार्ड अनिवार्य केले आहे.याचाच गैरफायदा घेऊन एजंट प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत.पावतीवर स्पष्टपणे १९९ रुपये असताना २५० रुपये घेणे हा थेट भ्रष्टाचार असून, याकडे जत आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
याप्रकरणी तक्रारदारांनी विभाग नियंत्रक,सांगली आणि महाव्यवस्थापक,मुंबई यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.संबंधित एजंटवर कडक कारवाई करून प्रवाशांचे जास्तीचे घेतलेले पैसे परत मिळवून द्यावेत,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.
७८७५९०३७७७.
