Maharashtra

एसी हॉलच्या मागणीवरून तुटले लग्न; वरपक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

एसी हॉलच्या मागणीवरून तुटले लग्न; वरपक्षाविरुद्ध गुन्हा दाखल;

जि. यवतमाळ. ता. (मारेगाव):दि. 10 एप्रिल 2026:
मारेगाव तालुक्यातील एका गावात हुंड्यासारख्या मागण्यांमुळे लग्न मोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एसी हॉलमध्ये लग्न करण्याच्या मागणीवरून वधूपक्षाने तक्रार दाखल केल्यानंतर वरपक्षाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उच्च शिक्षित वधूचे लग्न ठरले होते आणि साखरपुडाही पार पडला होता. मात्र, त्यानंतर वरपक्षाकडून लग्न एसी हॉलमध्येच करण्याची अट घालण्यात आली. ही मागणी थेट आर्थिक स्वरूपाची नसली तरी अप्रत्यक्षपणे खर्चिक अटी लादल्या जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

सदर वधू स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी बाहेर असताना तिला या मागण्यांची माहिती मिळाली. यानंतर तिने आपल्या वडिलांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला. “सोयीअभावी लग्न मोडले असे समजा, आमच्या घरी येऊ नका,” असे वरपक्षाकडून स्पष्ट सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वधूपक्षाने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हुंडाबंदी कायदा १९६१ तसेच भारतीय न्यायव्यवस्थेतील संबंधित तरतुदीनुसार (BNS कलम ३(५)) वरपक्षाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शाम वानखेडे व उपपोलीस निरीक्षक प्रवीण सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी दिगंबर किनाके करीत आहेत.

या घटनेमुळे समाजात पुन्हा एकदा हुंड्यासारख्या प्रथांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सुशिक्षित समाजातही अशा प्रकारच्या मागण्या होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button