दलित वस्ती सुधार योजनेतील निधीचा गैरवापर? सांगलीत गंभीर आरोप, आंदोलनाचा इशारा
दलित वस्ती सुधार योजनेतील निधीचा गैरवापर? सांगलीत गंभीर आरोप, आंदोलनाचा इशारा
जि. सांगली | दि. २ एप्रिल २०२६ – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत मंजूर झालेला निधी दलित वस्तीत न वापरता व्यापारी भागात खर्च केला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महानगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्र. १०, टिंबर एरिया येथे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून या कामास मंजुरी देण्यात आली असून ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
मंजूर काम भगवंत वर्कशॉप ते प्रकाश जनरल स्टोअर्स या दरम्यान होणे अपेक्षित असताना, ठेकेदार आणि महापालिकेचे सिटी इंजिनिअर यांच्या संगनमताने आरसीसी गटाराचे काम दुसऱ्याच ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा कामगार सेलचे अध्यक्ष विनायक हेगडे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी काम केले जात आहे तो भाग दलित वस्ती नसून पूर्णतः व्यापारी क्षेत्र आहे. त्यामुळे योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
हेगडे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, संबंधित निविदा तात्काळ रद्द करून निधी केवळ दलित वस्तीच्या विकासासाठीच वापरावा. तसेच याबाबत ८ दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. “आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
सदर प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर वातावरण तापले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार: विजय रणभोर, पुणे
मो. ९३५९२८०२२०