Maharashtra

दिंडोरीत भीषण दुर्घटना : विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; ६ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश

दिंडोरीत भीषण दुर्घटना : विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; ६ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश;

जि. नाशिक.ता.(दिंडोरी):दि. 5 एप्रिल 2026.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, रस्त्यालगतच्या शेतातील विहिरीत कार कोसळल्याने ६ निष्पाप शालेय विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब दिंडोरी येथील खाजगी वडजे क्लासेसच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना वाहनाचा ताबा सुटल्याने कार थेट शेतातील विहिरीत कोसळली आणि ही दुर्दैवी घटना घडली.

या अपघातात मृतांमध्ये श्री. सुनिल दत्तु दरगोडे, सौ. रेश्मा सुनिल दरगोडे, सौ. आशा अनिल दरगोडे यांचा समावेश असून, विद्यार्थ्यांमध्ये कु. सृष्टी अनिल (मनोहर) दरगोडे (इ. ८ वी), कु. श्रेयश अनिल (मनोहर) दरगोडे (इ. ५ वी), कु. श्रद्धा अनिल (दत्तु) दरगोडे (इ. ७ वी), कु. श्रावणी अनिल (दत्तु) दरगोडे (इ. ५ वी), कु. गुणवंती सुनिल (दत्तु) दरगोडे (इ. ४ थी) आणि कु. समृद्धी राजेंद्र (मनोहर) दरगोडे (इ. ८ वी) यांचा समावेश आहे. सर्व मृतक इंदोरे (ता. दिंडोरी) येथील रहिवासी होते.

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका शोकमग्न झाला असून, मृतांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button