Maharashtra

भूम तालुक्यात पाईपलाईन कामादरम्यान ब्लास्टिंग; सुरक्षा उपायांअभावी नागरिकांमध्ये संताप;

शेतकऱ्यांच्या जीवाला माती एवढे तरी मोल आहे का???

भूम तालुक्यात पाईपलाईन कामादरम्यान ब्लास्टिंग; सुरक्षा उपायांअभावी नागरिकांमध्ये संताप;

जि. धाराशिव. ता. (भूम):दि. 07 एप्रिल 2026;
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात सध्या सुरू असलेल्या मोठ्या पाईपलाईन प्रकल्पाच्या कामादरम्यान होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामेश्वर, चिंचोली, वरूड, सुकटा आणि सोनगिरी परिसरात हे काम वेगाने सुरू असून, मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी ब्लास्टिंगदरम्यान कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच संबंधित कंपनीने जिल्हाधिकारी व पर्यावरण विभागाची आवश्यक परवानगी घेतली आहे का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

या गंभीर प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. “जर भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय, पाईपलाईन काम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी काही स्थानिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचेही आरोप होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही असंतोष पसरला आहे.

दरम्यान, तहसील, महसूल व पोलिस प्रशासन या प्रकरणात शांत का आहे, असा प्रश्न समाजसेवक आणि नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button