भीमाशंकर मंदिर ९ एप्रिल ते ३१ मेपर्यंत दर्शनासाठी बंद; बांधकाम कामांना वेग;
भीमाशंकर मंदिर ९ एप्रिल ते ३१ मेपर्यंत दर्शनासाठी बंद; बांधकाम कामांना वेग;
जि. पुणे. (भीमाशंकर): दि. 10 एप्रिल 2026;
पुणे : भीमाशंकर मंदिर येथे सुरू असलेल्या बांधकाम कामांमुळे मंदिर गुरुवार, ९ एप्रिलपासून ३१ मेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात नवीन भव्य सभामंडप उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या मार्गाचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
सध्या मुख्य सभामंडप पूर्णपणे उतरवून नवीन बांधकाम सुरू असून, सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. घुमटाचे कामही सुरू आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य, दगड व यंत्रसामग्री असल्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, मंदिराकडे जाणारा प्रवेशमार्ग पूर्णतः बंद करण्यात आला असून पायऱ्यांचे कामही सुरू आहे. भीमाशंकर हा अतिवृष्टीचा भाग असल्याने जून ते सप्टेंबर दरम्यान येथे मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे मे महिन्यापूर्वीच ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
भाविकांनी या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे

