बेलठिका नगरातील पाणी प्रश्नावर तोडगा; संतोष बारणे दांपत्याची नवीन पाईपलाइन कामाची पाहणी

बेलठिका नगरातील पाणी प्रश्नावर तोडगा; संतोष बारणे दांपत्याची नवीन पाईपलाइन कामाची पाहणी
बेलठिका नगर परिसरातील गणेश कॉलनी, शिवदर्शन कॉलनी, आदर्श कॉलनी, स्वप्नपुष्प कॉलनी आणि कन्हैया पार्क या वसाहतींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी येणे तसेच अशुद्ध (दूषित) पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. परिणामी दैनंदिन कामांवर परिणाम होत होता, तर लहान मुलांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त केली जात होती.
नागरिकांच्या या वाढत्या तक्रारींची दखल घेत मोठ्या व्यासाच्या नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनचे काम तातडीने हाती घेतले आहे. हे काम बेलठिका नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जलदगतीने सुरू असून, परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या कामाची प्रत्यक्ष पाहणी मा. विरोधी पक्षनेते संतोष नागुभाऊ बारणे आणि नगरसेविका मायाताई संतोष बारणे यांनी केली. पाहणीदरम्यान त्यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला, पाईपलाइनची गुणवत्ता तपासली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
संतोष बारणे यांनी, “नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळाल्याच पाहिजेत. पाईपलाइनचे काम प्राधान्याने आणि गुणवत्तेने पूर्ण करा,” अशा स्पष्ट सूचना दिल्या. तर मायाताई बारणे यांनी स्वच्छ पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत महिलां व मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या कामाला गती देण्याचे आवाहन केले.
बारणे दांपत्याचे स्थानिक प्रश्नांबाबतचे सातत्यपूर्ण काम नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारे ठरत आहे. यापूर्वीही त्यांनी रस्ते, वीजपुरवठा आणि जलनिस्सारण यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या सुरू असलेले पाईपलाइनचे काम लवकर पूर्ण झाल्यास परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन पाईपलाइनमुळे नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
— प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी, पुणे
9822548429