आदित्य अर्बन बँक वालसा (वडाळा) शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

आदित्य अर्बन बँक वालसा (वडाळा) शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
वालसा (वडाळा), ता. भोकरदन / महेंद्र बेराड :
आदित्य अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, भोकरदन अंतर्गत वालसा (वडाळा) शाखेचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. मंगळवार, दि. ०८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाला ग्राहक,सभासद, ठेवीदार, खातेदार, स्थानिक संचालक मंडळ तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात विधिवत पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर काशीराम पायघन, संस्थापक अध्यक्षा सौ. सविता नंदकिशोर पायघन, पारध येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सर बेराड, कोसगाव येथील पत्रकार सुनील भाऊ उंबरकर तसेच बाळू कतोरे, दिगंबर कतोरे, मोहन कतोरे, सुभाष शेठ पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बँकेच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा सादर करण्यात आला. आर्थिक प्रगतीसोबतच ग्राहकांना दिलेल्या उत्कृष्ट सेवेमुळे बँकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. बँकेच्या यशस्वी वाटचालीत ग्राहकांचा विश्वास व कर्मचाऱ्यांचे परिश्रम हे महत्त्वाचे घटक असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
सकाळी ८ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत वर्धापन दिनानिमित्त स्वागत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांसाठी अल्पोपहार व चहापानाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
संस्थापक अध्यक्षा सौ. सविता पायघन व अध्यक्ष श्री. नंदकिशोर पायघन यांनी सर्वांचे आभार मानत, भविष्यात ग्राहकांना अधिक आधुनिक व दर्जेदार सेवा देण्याचा तसेच भोकरदन तालुक्यात आणखी नवीन शाखा सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक मंडळ, स्थानिक सल्लागार व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. या वर्धापन दिनामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
