वादळी पावसात वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान
वादळी पावसात वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान
पारध (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध रामनगर (चौरीवाडी) येथे काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसात एक दुर्दैवी घटना घडली.अचानक आकाशात जोरदार वीज कडाडत असताना गट नंबर २०८ मधील शेतात बांधलेल्या बैलावर वीज कोसळली. या भीषण घटनेत बैलाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार फकीरा भुते रा.पारध हे युवा शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असून बैल हा त्याच्या शेतीकामाचा मुख्य आधार होता. बैलाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे अंदाजे ५० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच तलाठी चेतन राजपूत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यात बैलाचा मृत्यू वीज पडल्यामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने अशा प्रकरणांमध्ये तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी,अशी मागणी परिसरातील स्थानिक शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

