सोनाळा-दुनकी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; हरिण-काळविटांचा फडशा
सोनाळा-दुनकी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; हरिण-काळविटांचा फडशा
संग्रामपूर (ता. 20 मार्च 2026) : तालुक्यातील सोनाळा, दुनकी व बावनबीर शिवार परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांत बिबट्याने हरिण व काळविट या वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी बावनबीर शिवारात विजय भगत यांच्या शेतात काळविट मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुनकी येथील राहुल पुंडे यांच्या शेतात हरीण मृत अवस्थेत सापडले. या दोन्ही घटनांमध्ये बिबट्याचा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकारामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, बिबट्याचा मुक्त वावर असल्याने शेतातील कामे करताना शेतकरी धास्तावलेले दिसत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळले जात आहे. जनावरांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली असून, बिबट्याचा बंदोबस्त करून परिसर सुरक्षित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी – विजय रणभोर


